पुणे : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती स्थापन करून राज्यव्यापी ‘बेमुदत काम बंद आंदोलन’ करण्यात आले आहे. काम बंद आंदोलनचा आजचा दुसरा दिवस असून कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
सोमवारपासून (ता. २०) महाराष्ट्र राज्यातील व पुणे शहरातील विविध महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. आश्वासित प्रगती योजना, जुनी पेन्शन योजना, नोकर भरती अशा विविध मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील बहुसंख्य महाविद्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर आहेत.
मंगळवारी (ता. २१) सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षाचा ताण शिक्षकांवर पडलेला दिसून येत होता. विनाअनुदानित कर्मचाऱ्यांच्या अल्पसंख्या बळावर इयत्ता बारावीच्या परीक्षा घेताना महाविद्यालय परीक्षा विभागाची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली.
दरम्यान, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने व्यक्त केली असून लवकरच लेखी शासन निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. तसेच बेमुदत काम बंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम होते.