पुणे : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
दीपक केसरकर पुढे म्हणाले की, २२ डिसेंबर २०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या निर्णयाची अंमलबजावणी रखडली होती.
या निवडणुका पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून १ जानेवारी २०२३ पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार आहे. वाढीव मानधनानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना १६ हजार रूपये मानधन मिळणार आहे.
तर माध्यमिक वर्गातील शिक्षण सेवकांना १८ हजार रूपये तसेच उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना २० हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येणार आहे.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्येदेखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना १४ हजार रूपये तर पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना १२ हजार रूपये, कनिष्ठ लिपिकास 10 हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती यांना आठ हजार रूपये मानधन मिळणार आहे.