पुणे : भोसरीतील १३ वर्षीय आयुषने भीम पराक्रम केला आहे. आयुषने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तलावात बुडणाऱ्या दोघांचे प्राण वाचविले आहे. त्यामुळे त्याला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिली येथे येत्या प्रजासत्ताकदिनी पुरस्कार दिला जाणार आहे.
आयुष गणेश तापकीर या चिमुकल्याने २ मुलाचे प्राण वाचवून शौर्याची कामगिरी केली आहे. आयुष हा भोसरी येथील सद्गुरूनगर परिसरात वास्तव्यास आहेत. तापकीर कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. तसेच त्यांचा गुरांच्या पालनाचा जोड व्यवसाय आहे. कोरोना काळात २०२१ मध्ये आयुष हा इयत्ता आठवीत शिकत होता. मात्र, शाळा बंद असल्याने मोबाइलवर ऑनलाईन क्लासला हजेरी लावत होता.
२७ सप्टेंबर २०२१ रोजी ऑनलाईन क्लास झाल्यानंतर दुपारी आयुष हा म्हशींना तलावावर घेऊन गेला. आयुष हा तलावावर गेला असता, तेव्हा आयुषला ३ मुले पाण्यात बुडताना दिसली. त्यानंतर त्याने तलावात उडी मारली. आणि बुडणाऱ्या तीन मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यातील एकाच्या पोटातील पाणीही पोट दाबून काढले. या तीन मुलांपैकी दोघांचा जीव वाचवण्यात आयुष याला यश आले. तर एकाचा मृत्यू झाला.
दरम्यान, लहान मुलांच्या शौर्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय स्तरावर बाल शौर्य पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाला हा पुरस्कार प्रदान केला जातो. आयुष तापकीर याची ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२१’ यासाठी निवड झाल्याचे सरकारच्या भारतीय बाल कल्याण परिषदेतर्फे कळविण्यात आले. येत्या प्रजासत्ताकदिनी आयुष्याला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.