पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत २५३ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढली असून, संबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या लाभाची व्याप्ती वाढवणे, नवीन अभ्यासक्रमांचा आवश्यकतेनुसार योजनेत समावेश करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सचिवस्तरीय प्रदत्त समितीला अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील २५३ अभ्यासक्रमांचा समावेश शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून नव्याने समावेश करण्याचा निर्णय प्रदत्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
या समितीच्या निर्णयानुसार उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या अखत्यारितील मास्टर ऑफ ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट अँण्ड एम्प्लाइ रिलेशन या अभ्यासक्रमाचाही समावेश आहे. या अभ्यासक्रमांचे मॅपिंग महाडीबीटी संकेतस्थळावर करण्याची कार्यवाही महाआयटीने करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.