पिंपरी : पिंपरी महापालिका शाळांतील १२.६७ टक्के विद्यार्थ्यांकडे अद्याप आधारकार्ड नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. तसेच येत्या ३१ तारखेपर्यंत आधार कार्ड नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे.
महापालिका शाळांमध्ये लाख ५१ हजार ७१५ विद्यार्थी आहेत. त्यातील ३ लाख ७ हजार १७७ विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी पूर्ण झालेली आहे. अद्याप ४४ हजार ५३८ विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची नोंदणी बाकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण १२ .६७ टक्के इतके आहे. तर, ६५ हजार ३२५ विद्यार्थ्यांचे नाव, लिंग आणि आडनावात दुरुस्ती करणे बाकी आहे.
सरकारी आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असेल, तरच त्याला शालेय पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार होता. त्यामुळे येत्या ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून ते शालेय पोषण आहाराशी लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार, १ जानेवारी २०२३ पासून आधारकार्ड असणार्या तसेच तो विद्यार्थी या योजनेशी लिंक असल्यावरच त्याला शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणार होता.
दरम्यान, आधार कार्ड नोंदणी होईपर्यंत राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला शालेय पोषण आहार किंवा कोणत्याही सरकारच्या योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किंवा अन्य योजनांपासून सद्यस्थितीत तरी वंचित राहावे लागणार नाही.