राज्यातील अकरावीच्या केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीसाठी १ लाख ३८ हजार १०१ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली आहे. तसेच ५ लाख ५३ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरला आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

निवडयादी १७ जुलै रोजी; प्रवेशासाठी १८ ते २१ जुलैपर्यंत कालावधी
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या फेरीची निवडयादी १७ जुलै रोजी जाहीर होणार आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलै या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
९ हजार ४६९ कनिष्ठ महाविद्यालयांत २१ लाखांहून अधिक जागा उपलब्ध
राज्यातील ९ हजार ४६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख ३२ हजार ९६० जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये ७५ हजार ८०९ राखीव कोट्यातून, तर ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थी पहिल्या फेरीद्वारे प्रवेश घेतलेले आहेत.
१६ लाखांहून अधिक जागा अद्याप रिक्त
संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, अजूनही १६ लाख २४ हजार ८६४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्या फेरीतील यश आणि अपयश
पहिल्या फेरीत ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.
विज्ञान शाखेसाठी:
६,०९,७१८ पैकी ३,४२,८०१ विद्यार्थ्यांना प्रवेश
वाणिज्य शाखेसाठी:
२,२३,९३१ पैकी १,३९,६०२ विद्यार्थ्यांना प्रवेश
कला शाखेसाठी:
२,३१,३५६ पैकी १,३९,७९१ विद्यार्थ्यांना प्रवेश
तथापि, निवड यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त ६८ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला.
दुसऱ्या फेरीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
पहिल्या फेरीतील तांत्रिक अडचणी आणि अपेक्षित प्रवेशाचा प्रतिसाद पाहता, आता दुसऱ्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उर्वरित लाखो विद्यार्थ्यांसाठी ही फेरी निर्णायक ठरणार आहे.







