संतोष पवार
मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती (MAHAJYOTI) या संस्थेच्या पीएचडी अधिछात्रवृत्ती सन 2021 व 2022 मधील पात्र 1884 संशोधक विद्यार्थ्यांना आणि पीएचडी अधिछात्रवृत्ती- 2023 मधील 1 हजार 454 विद्यार्थ्यांपैकी पात्र 870 संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. बार्टी संस्थेप्रमाणे (BARTI) महाज्योती संस्थेमधील संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून १०० टक्के आधिछात्रवृत्तिचा लाभ देण्याबाबतचा अध्यादेश इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा संशोधन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) व इतर तत्सम स्वायत्त संस्थांमार्फत कार्यान्वित असलेल्या तसेच भविष्यात प्रास्तावित करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वसतिगृह व वसिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये एकसमानता राहावी, यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी समिती स्थापन करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने १० सप्टेंबर रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून बार्टीच्या मार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती योजनेतील 763 विद्यार्थ्यांची जाहिरातीनुसार असलेल्या अर्जामधील कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर महाज्योती संस्थेतील पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.