हडपसर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातून बदली होत उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय प्राचार्य अशी ओळख असलेले प्राचार्य डॅा. नितीन घोरपडे यांची नियुक्ती झाली आहे.
यावेळी कार्यभार स्वीकारत असताना डॅा. नितीन घोरपडे यांनी काळानुरूप तंत्रज्ञानाधारित शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यावर महाविद्यालय भर देणार असल्याचे नमूद करत महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या घटकांना केंद्रबिंदू मानत कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्य व गुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त करत नूतन महाविद्यालयाचा आढावा घेतला.
डॅा. नितीन घोरपडे यांनी प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी, वाघिरे महाविदयालय सासवड,मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौंड रोड व बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी या ठिकाणी आपल्या कुशल प्रशासकीय कार्याची छाप सोडलेली आहे. त्यांच्या यशस्वी शैक्षणिक कारकीर्दीची माहिती घेताना लक्षात येते की डॉ. नितीन घोरपडे यांची शैक्षणिक अहर्ता एम.कॅाम, बीएड,एम.फील, सेट, पीएचडी असून १४ वर्षाच्या प्राचार्य पदाचा त्यांना अनुभव आहे. त्याच्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात ही त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरू झाली. १९९० साली एम.कॉम. मध्ये शिकत असताना त्यांनी पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता श्रेणीमध्ये सहावे स्थान मिळवले होते.
डॅा. नितीन घोरपडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर २ वेळा अध्यक्ष तर विद्या परिषद व आरआर समिती सदस्य म्हणून दोन वेळा काम पाहिले आहे. आजपर्यंत अनेक यशस्वी विद्यार्थी त्यांनी घडविले असून यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. व ८ विद्यार्थ्यांनी एम.फील. यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आतापर्यंत २२ पुस्तके त्यांच्या अभ्यासपुर्ण लेखनीतून प्रकाशित झाली असुन विद्यापीठ व केंद्र शासनाच्या विविध योजनांशी संबंधित ४ संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
दरम्यान, युजीसी मान्यताप्राप्त प्रतिष्ठित अशा विविध जर्नल्स मध्ये ३५ संशोधन पेपर प्रदर्शित झाले असून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, पर्यावरण विषयक ४५ लेख विविध मराठी, हिंदी व इंग्रजी वर्तमानपत्रांतून प्रदर्शित झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची पावती म्हणून अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले ३५ पुरस्कार त्यांना मिळाले असून सध्या राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणपत्र परिषद (नॅक) समिती वर सदस्य म्हणून महत्वाची कामगिरी पार पाडत आहेत.
डॉ. नितीन घोरपडे यांच्या हडपसर येथे झालेल्या बदलीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून महाविद्यालयाच्या विकासाला सर्वार्थाने गती मिळेल असा विश्वास सर्वजण व्यक्त करत आहेत.