नवी दिल्ली : सध्या गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यात शेअर मार्केट नंतर बँकांमध्ये गुंतवणूक केली जात आहे. असे असताना आता एफडी अर्थात फिक्स डिपॉझिट हा चांगला परतावा देणारा पर्याय मानला जातो. एफडीमधील गुंतवणूक केवळ सुरक्षितच नाही तर वेगवेगळ्या बँकांद्वारे गुंतवणूकदारांना मजबूत परतावाही मिळत आहे.
तुम्हीही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ एक खास संधी देत आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ‘युनियन बँकेच्या वेबसाईट’नुसार, नवीन व्याजदर 1 जून 2024 पासून लागू होणार आहेत. बँक सात ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3.5 टक्के व्याजदर देत आहे. आता 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के व्याजदर उपलब्ध आहे.
तर ज्येष्ठ नागरिक सामान्य दरांपेक्षा 0.50 टक्के जास्त व्याजासाठी पात्र आहेत. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक 7.75 टक्के व्याजदर 399 दिवसांच्या कालावधीसाठी दिला जातो. अति ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक 0.75 टक्के जास्त व्याजदर देते. 399 दिवसांच्या कालावधीसाठी दिलेला सर्वोच्च व्याज दर 8 टक्के आहे. त्यामुळे या बँकेत गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.