नवी दिल्ली : आयटीआर रिटर्न भरण्याच्या कालावधीत अनेकदा वाढ केली जाते. यावर्षी 31 जुलै ही ITR रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आहे. पण आता ही मुदत वाढवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच प्राप्तिकर विभागाने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीनुसार, 26 जुलै 2024 पर्यंत सुमारे 5 कोटी आयकरदात्यांनी त्यांचे कर विवरणपत्र भरले आहे. या वर्षात एक दिवस आधी 5 कोटी आयकर परताव्याची आकडेवारी गाठली गेली आहे. गेल्या वेळी 27 जुलै रोजी कर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या 5 कोटींवर गेली होती. त्यात सध्या करदाते आणि चार्टर्ड अकाउंटंट संघटनांनी ई-फायलिंग पोर्टलमध्ये येणाऱ्या समस्यांबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे याच्या मुदतीत वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
प्राप्तिकर विभागाने म्हटले की, जे करदाते 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल करणार नाहीत, त्यांच्याकडे दंडासह रिटर्न भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ आहे. दुसरीकडे, प्राप्तिकर विभाग देखील करदात्यांना 31 जुलै 2024 पूर्वी रिटर्न भरण्याचे आवाहन करत आहे.