नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेची दर दोन महिन्यांनी होणारी चलनविषयक धोरण समिती (MPC) बैठक सोमवारपासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सुरू झाली. MPC चे अध्यक्ष आणि RBI गव्हर्नर शक्तिकांत दास हे बुधवारी (दि.9) तीन दिवसीय बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करतील. त्यातूनच कर्ज स्वस्त होणार की आणखी महागणार याची माहिती मिळू शकणार आहे.
आरबीआय व्याजदरात कपात करून लोकांना स्वस्त कर्ज देण्याचा मार्ग मोकळा करेल, अशी सामान्य माणूस, शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांना आशा आहे. मात्र, रिझर्व्ह बँक सध्यातरी असा कोणताही निर्णय टाळेल, असे अर्थविषयक तज्ज्ञांचे मत आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, किरकोळ चलनवाढ हा अजूनही मध्यवर्ती बँकेसाठी चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे, पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा कच्च्या तेलाच्या आणि वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत व्याजदर कपातीचा कोणताही निर्णय होईल, अशी आशा कमी आहे.
त्यात रिअल इस्टेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशात दसरा, धनत्रयोदशी असे शुभ दिवस किंवा प्रसंग असतात जेव्हा लोक नवीन घरांच्या बुकिंगसोबत घरे खरेदी करतात. आरबीआयने व्याजदर वाढवल्यास गृहकर्जाचे हप्ते वाढतील आणि लोक खरेदीपासून दूर राहतील. व्याजदरात कपात झाल्यास सर्वच क्षेत्रांना फायदा होईल, असेही सांगितले जात आहे.