पुणे : येत्या एक जून पासून अनेक आर्थिक नियम बदणार आहेत. बँकिंग, विमा आणि इतर आर्थिक बाबींशी संबंधित नियम बदलणार आहेत ज्यामुळे आता नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. 1 जून 2024 पासून कोणते नवीन आर्थिक नियम लागू होतील ते खालील मुद्द्याच्या आधारे जाणून घेऊयात.
आधार कार्ड बदल : 14 जूनपर्यंत सामान्य लोकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधार कार्डमध्ये बदल करता येतील. आधार सेंटरवर जाऊन आधार कार्डमध्ये बदल करायचा असल्यास प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये द्यावे लागतील.
अल्पबचत योजनेच्या व्याजदरात बदल : पीपीएफ, KVP आणि सुकन्या समृद्धीसारख्या छोट्या बचत योजनेचे व्याजदर दर तिमाहीत बदलतात. अनेकदा जुने व्याजदर कायम ठेवले जातात, त्यामुळे आता ३० जूनला नव्या दरांबाबत सरकारच्या नियमांकडे लोकांचे लक्ष लागून असेल.
गॅस सिलिंडरच्या दरात बदल : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिडंरच्या दरात बदल होत असतात. याआधी 9 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी झाले होते. व्यावसायिक गॅसदेखील एप्रिल महिन्यात स्वस्त झाला होता. आता जूनमध्ये याच्या किमती वाढणार की घटणार ते पाहावं लागेल.
ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टच्या नियमात बदल : सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात बदल केला असून आता सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजे RTO ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. त्याऐवजी, आता खाजगी संस्थांना टेस्ट घेण्यास आणि प्रमाणपत्रे देण्यास अधिकृत करण्यात आले असताना १ जूनपासून नवा नियम लागू होईल.
वाहतुकीच्या नियमात बदल : अल्पवयीन मुले गाडी चालवताना दिसल्यास त्यांच्या पालकांकडून मोठा दंड आकारला जाणार आहे. हा दंड 25 हजार रुपयांपर्यंत असू शकतो. यासोबतच 25 वर्षांपर्यंत लायन्सन्स देण्यात येणार नाही. यासोबतच वेगाची मर्यादा ओलांडत एखाद्या व्यक्तीने गाडी चावल्यास 2000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. यापूर्वी यासाठी 1000 रुपये आकारले जात होते. तसेच लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.