नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज (दि.20) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजार बंद राहणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत या दिवशी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही, असे एनएसईने सांगितले आहे.
निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याचे सांगितले होते. 8 एप्रिल रोजी, NSE आणि BSE या शेअर बाजारांनी 20 मे रोजी होणाऱ्या मतदानामुळे मुंबईतील शेअर बाजारासाठी सुट्टी जाहीर केली आहे. ‘एनएसई’ने परिपत्रकात म्हटले की, मुंबईत लोकसभा निवडणुकीमुळे सोमवारी व्यापार सुट्टी असेल. या दिवशी इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि सिक्युरिटीज लँडिंग आणि बोरोइंग सेगमेंटमध्ये कोणताही व्यवहार होणार नाही.
दरम्यान, 20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि पालघर लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. 4 जून 2024 या दिवशी मतमोजणी होणार आहे.