नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख आता जाहीर झाली आहे. त्यानुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 23 जुलै रोजी लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अशाप्रकारे सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या अर्थमंत्री ठरल्या आहेत.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांची घोषणा केली आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात आता 23 जुलै रोजी अर्थमंत्री सीतारामन सलग सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री असताना सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.