मुंबई : सहारा समूहामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, त्यांचे अडकलेले पैसे आता लवकरच परत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सहारा समूहाच्या सहकारी सोसायट्यांच्या छोट्या ठेवीदारांसाठी सरकारने पैसे काढण्याची मर्यादा 10,000 रुपयांवरून 50,000 रुपये केली आहे.
सहकार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. सरकारने आतापर्यंत CRCS-सहारा रिफंड पोर्टलद्वारे सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या 4.29 लाखांहून अधिक ठेवीदारांना 370 कोटी रुपये जारी केले आहेत. परताव्याच्या रकमेची मर्यादा 50,000 रुपयांपर्यंत वाढवून, पुढील 10 दिवसांत सुमारे 1,000 कोटी रुपये वितरित केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात छोट्या ठेवीदारांसाठी परताव्याच्या रकमेची मर्यादा 10,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात आली होती, असे या अधिकाऱ्याने सांगितले. सरकार परतावा देण्यापूर्वी ठेवीदारांच्या दाव्यांची बारकाईने तपासणी करत आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा सहारा समूहाच्या हजारो गुंतवणूकदारांना होणार आहे.