नवी दिल्ली : सध्या जागतिक स्तरावर रोजगार निर्मितीचे आव्हान बनले आहे. त्यामुळे बेरोजगारीचे संकट ओढवू शकते. अशी परिस्थिती असताना आता एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. कंपनीकडून लवकरच तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार आहे. त्यानुसार, संबंधित कर्मचाऱ्यांना मेलही आले आहेत.
‘इलेक्ट्रेक’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यामध्ये 14 हजार कर्मचाऱ्यांना कर्मचारी कपातीचे मेल केले आहेत. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीतील मंदीमुळे टेस्ला जागतिक स्तरावर 10 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी कमी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ठराविक भागात कामाच्या समान स्वरुपामुळे ही कपात होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये एलॉन मस्क यांनी सांगितले की, ‘आम्ही कंपनीला आमच्या वाढीच्या पुढील टप्प्यासाठी तयार करत आहोत. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कंपनीच्या प्रत्येक बाबींवर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे’.
तसेच या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही कंपनीचे सखोल पुनरावलोकन केले आहे आणि जागतिक स्तरावर आमची संख्या 10 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय कठोर असला तरीही तो आम्हाला घ्यावा लागणार आहे, असेही त्यात म्हटले आहे.