नवी दिल्ली : सध्या दुकानात प्रत्यक्ष जाण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंगलाच अनेकांकडून पसंती दिली जाते. बाजारभावापेक्षा कमी किमतीत अनेक वस्तू मिळत असल्याने याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपन्या करचोरी करत असल्याचे आढळून आले आहे. या कंपन्यांनी सोशल मीडियावरून वस्तूंची विक्री करून सरकारला दहा हजार कोटींचा चुना लावला आहे.
ऑनलाईन माध्यमातून विक्री करणाऱ्या अशा तब्बल 45 कंपन्यांना आयकर विभागाने नोटीस बजावल्या आहेत. या कंपन्यांनी तीन वर्षांत सुमारे 10 हजार कोटी रुपयांची करचोरी केल्याचे आढळून आले आहे. यामध्ये कोणतीही मोठी ई-कॉमर्स कंपनी नाही. या 45 पैकी 17 कंपन्या कपडे विकणाऱ्या आहेत. 11 दागिने विकणाऱ्या कंपन्या आहेत. 6 शूज आणि पिशव्या विकणाऱ्या कंपन्या आहेत. असे जरी असले तरी आणखी अनेक कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयकर विभागाने दिली.
आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ”मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांव्यतिरिक्त, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील स्टोअर्सवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या कंपन्यांनी भरलेल्या आयटी रिटर्नच्या माहितीतून करचोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पडताळणी केल्यावर करचोरीचा प्रकार उघड झाला. त्यानंतर नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत”.