मुंबई : टाटा समूहाची कंपनी टाटा पॉवर आता 1.46 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2030 पर्यंत कंपनी इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातच याच कंपनीने केवळ एका वर्षात 56 टक्के परतावा दिला आहे.
कंपनी 2030 पर्यंत 32 GW पर्यंत ऑपरेटिंग क्षमता दुप्पट करण्यासाठी सुमारे 1.46 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. तिरुनेलवेली, तामिळनाडू येथील कंपनीच्या सेल मॉड्यूल प्लांटमध्ये ही माहिती देण्यात आली. टाटा पॉवरची 2023-24 या आर्थिक वर्षात स्थापित क्षमता 15.6 GW होती, त्यापैकी 6.7 GW ही अक्षय ऊर्जा होती. 2030 च्या ध्येयाबाबत बोलताना कंपनीने म्हटले की, ऑपरेशनल क्षमता 31.9 GW पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा 23 GW असेल.
टाटा पॉवर ऊर्जा क्षेत्रातील पारेषण क्षेत्रातही देशाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. 2023-24 आर्थिक वर्षात कंपनीची ट्रान्समिशन लाईन क्षमता 4,633 CKM (सर्किट किलोमीटर) वरून 10,500 CKM पर्यंत वाढवण्याची योजना आहे. टाटा पॉवरने ग्राहक संख्या 1.25 कोटींवरून चार कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.