नवी दिल्ली : रस्त्यावर धावणाऱ्या कार आपल्याला काही नवीन नाहीत. पण या कार चालवताना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, आता याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. कारण, उडत्या कार अर्थात ‘फ्लाईंग कार’ची निर्मिती केली जात आहे. प्रसिद्ध कार निर्माता कंपनी सुझुकीने आपल्या पहिल्या फ्लाईंग कारचे उत्पादन सुरू केले आहे.
सुझुकी कंपनी ही ‘स्काय ड्राईव्ह’च्या सहकार्याने कारची निर्मिती करत आहे. त्याचे उत्पादन जपानमधील इवाता प्लांटमध्ये सुरूही करण्यात आले आहे. या प्लांटमध्ये वर्षभरात 100 इलेट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग फ्लाईंग कार तयार करता येतील. या फ्लाईंग कार पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील. सुझुकीची ही स्काय ड्राईव्ह फ्लाईंग कार एक प्रकारची इलेट्रिक ड्रोन असणार आहे.
सुझुकीने नुकतीच ‘इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024’मध्ये ही फ्लाईंग कार लाँच केली होती. या कारला भविष्यात हवाई टॅक्सी म्हणूनही सेवेत आणण्याचा विचार होण्याची शक्यता आहे. कारण, सध्याचा वाहतुकीचा प्रश्न पाहता यावर निर्णय होईल, असे सांगितले जात आहे.