नवी दिल्ली : शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 16 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या काळात सेन्सेक्स अवघ्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये 4,100 अंकांपेक्षा अधिक घसरला. इराण आणि इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचल्यानंतर बाजारात ही घसरण झाली आहे. दुसरीकडे, चीनकडून प्रोत्साहन पॅकेजची घोषणा देखील केली आहे.
आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.4) 30 शेअर्सचा प्रमुख बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 808.65 (0.98%) अंकांच्या घसरणीसह 81,688.45 वर बंद झाला. दुसरीकडे, 50 शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 235.50 (0.93%) अंकांनी घसरला आणि 25,014.60 वर बंद झाला. या काळात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 83.97 वर जवळपास स्थिर राहिला.
पाच व्यापार सत्रात सेन्सेक्स 4148 अंकांनी घसरला
याआधी गुरुवारी सेन्सेक्स 1,769 अंकांनी घसरला होता, निफ्टीही कमकुवत होऊन 25,000 च्या महत्त्वाच्या पातळीवर पोहोचला होता. 27 सप्टेंबरपासून शेवटच्या 5 व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स 4,148 अंकांनी घसरला. या कालावधीत, BSE वर सूचीबद्ध समभागांचे एकत्रित बाजार भांडवल 15.9 लाख कोटी रुपयांनी घसरून 461.26 लाख कोटी रुपये झाले.