मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. कारण, या शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळत आहे. त्यातच दिवसाअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 147.89 अंशांनी वधारून 81,053.19 पातळीवर बंद झाला. दिवसभरात 331.15 अंशांची कमाई केली.
सेन्सेक्समध्ये भारती एअरटेलचा शेअर 1.63 टक्क्यांनी वधारला आहे. त्यापाठोपाठ एशियन पेंट्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टायटन आणि अल्ट्राटेक सिमेंट्सचे शेअर्सही तेजीत होते. तर महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, टीसीएस आणि पॉवरग्रीड यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहिला मिळाले. ‘बँक फेडरल रिझर्व्ह’च्या ताज्या बैठकीच्या प्रसिद्ध झालेल्या इतिवृत्तातून, सप्टेंबरमध्ये संभाव्य व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे, असे मत शेअर मार्केटमधील जाणकारांनी नोंदवले आहे.
दरम्यान, आज सेन्सेक्स 81,000 अंशांच्या पातळीवर, तर निफ्टी 24,800 या महत्त्वाच्या पातळीपुढे स्थिरावले. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईचा निर्देशांक निफ्टीमध्ये 41.30 अंशांची वाढ झाली आणि तो 24,811.50 पातळीवर बंद झाला.