मुंबई : स्टार इंडिया या कंपनीने झी एंटरटेन्मेंटवर 94 कोटी डॉलरचा दावा ठोकला आहे. वॉल्ट डिस्नेच्या भारतीय युनिट स्टार इंडियाने लंडन लवाद न्यायालयात झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेसकडून $ 940 दशलक्ष नुकसान भरपाईची मागणी केली आहे. स्टार इंडियाच्या म्हणण्यानुसार, पुनित गोएंका यांच्या कंपनीने क्रिकेट प्रसारण हक्कांसाठी पैसे भरण्यात अनियमितता दिसून आली.
स्टार इंडियाने संपूर्ण पेमेंट होईपर्यंत खर्च आणि त्यावर लागू असलेले व्याज देखील मागितले आहे. दुसरीकडे, ‘झी’ने स्टार इंडियाचे नुकसानीचे दावे फेटाळून लावले असून, या दाव्याला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई-सूचीबद्ध ब्रॉडकास्टरने एका नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, लवाद त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असून, कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार आहे की नाही हे लंडन न्यायाधिकरणाने अद्याप ठरवलेले नाही.
26 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या कराराचे पालन करण्यात झी अयशस्वी ठरल्यानंतर या वर्षी मार्चमध्ये, स्टारने लंडन न्यायालयात आंतरराष्ट्रीय लवादाकडे धाव घेतली होती. या कराराअंतर्गत, त्याला (स्टार इंडिया) ICC साठी टेलिव्हिजन प्रसारण परवाना झी ला द्यायचा होता. 2024 ते 2027 या चार वर्षांसाठी या स्पर्धेचे यजमानपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.