Indian Economy: नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था ही सेवा उद्योगांच्या भक्कम कामगिरीवर अवलंबून आहे. अर्थव्यवस्थेवरील सेवा क्षेत्राचा प्रभाव वाढत चालला आहे. याचवेळी कृषी आणि इतर प्राथमिक उद्योगांचा अर्थव्यवस्थेतील हिस्सा कमी होत आहे. त्यात आता भारतीय अर्थव्यवस्थेची आगेकूच कायम राहणार असून, चालू आर्थिक वर्षांत विकासदर 6 टक्के राहील, असा अंदाज ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने वर्तवला.
अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये तो 6 टक्के राहील, तर आर्थिक वर्ष 2024-25 आणि 2025-26 मध्ये विकास दर 6.9 टक्के राहील, असा अंदाज आहे. ‘एस अँड पी’ने आशिया प्रशांत विभागासाठी जाहीर केलेल्या आर्थिक अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्था भक्कम विकास दराच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
विकासदरातील वाढीमुळे बाजारपेठेतील आत्मविश्वासाला बळ मिळत असून, महसूल वाढीलाही गती मिळत आहे. मात्र, जादा व्याजदर हे देशाच्या कर्जासाठी पुढील पाच वर्षांत निर्णायक ठरतील. भांडवली खर्चातील वाढ आणि वाढलेली उत्पादकता या दोन घटकांमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळत आहे.