मुंबई : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली आहे. सकाळी तेजीसह उघडल्यानंतर बीएसई सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून जवळपास 1600 अंकांनी घसरला आहे. निफ्टी दिवसाच्या उच्चांकावरून 500 अंकांनी घसरला आहे. तर ‘मिड कॅप’ निर्देशांकात सकाळच्या उच्चांकापासून 2200 अंकांची मोठी घसरण दिसून आली.
झी एंटरटेनमेंटच्या शेअरमध्ये आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण झाली असून, जो 27.40 टक्क्यांच्या घसरणीसह व्यापार केला. ओबेरॉय रियल्टी 8.95 टक्के, आयआरसीटीसी 6.69 टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँक 6.61 टक्के, आयडीएफसी 6.50 टक्के, एमसीएक्स इंडिया 5.87 टक्के घसरला. बाजारात बँकिंग आणि ऊर्जा समभागांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टी 900 अंकांच्या घसरणीसह 45,134 अंकांवर व्यवहार करत आहे.
सध्या सेन्सेक्स 1030 अंकांच्या घसरणीसह 71000 च्या खाली 79,380 अंकांवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 343 अंकांच्या घसरणीसह 21,226 अंकांवर व्यवहार करत आहे. भारतीय शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे आतापर्यंत सुमारे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आजच्या व्यवहारात रेल्वेशी संबंधित शेअर्समध्ये सुरू असलेल्या वाढीला ब्रेक लागला आहे.