मुंबई : शेअर बाजारात आज (दि.23) चांगली वाढ दिसून आली. सेन्सेक्समध्ये जवळपास 300 अंकांची वाढ झाली असून, हा आकडा 73,900 वर गेला आहे. सेन्सेक्ससह निफ्टीमध्येही 80 अंकांची वाढ झाली. रिॲल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली आहे.
शेअर बाजारामध्ये मंगळवारी खरेदी सुरू आहे. ही खरेदी सलग तिसऱ्या दिवशीही सुरु आहे. या शेअर बाजाराला चांगल्या जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सेन्सेक्सने जवळपास 300 अंकांची वाढ होऊन 73,900 चा स्तर ओलांडला आहे. त्यात ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ अर्थात बीएसईचे बाजार भांडवल 399.44 लाख कोटी रुपयांवर आले आणि ते 400 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढताना दिसत आहे.
याशिवाय, सध्या बीएसईवर 2966 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. त्यापैकी 2040 शेअर्समध्ये वाढ होत आहे. तर 98 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होताना दिसत आहेत. तर 828 शेअर्सचे भाव घसरताना दिसत आहेत. यात कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह आणि टायटनच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.
दरम्यान, या घसरलेल्या शेअर्समध्ये एल अँड टी, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि इंड्सइंड बँक यांचा समावेश आहे.