दिल्ली : केंद्र सरकारकडून कोट्यवधी पीएफ खातेदारांना दिलासा देणारा एक निर्णय दिला आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) मध्ये असणारा खातेदाराचा पैसा सरळ एटीएममधून काढता येणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव सुमित्रा डावरा यांनी यासंदर्भात प्लॅन सांगितला आहे. ईपीएफओ आपल्या आयटी प्रणालीत बदल करत आहेत. त्यामुळे पीएफ दावे निकाली काढण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. तसेच पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून पीएफचे पैसे एटीएममधून काढता येणार असल्याचे समोर आले आहे.
सुमित्रा डावरा यांनी सांगितले की, ईपीएफओची प्रणाली ही बँकींग पद्धतीची करण्यात येणार आहे. जानेवारी 2025 पर्यंत ईपीएफओचे नवीन व्हर्जन IT 2.1 लॉन्च करण्यात येणार आहेत. या नवीन प्रणालीमुळे पीएफ दावे, लाभार्थी किंवा वारस असणाऱ्या व्यक्तींना थेट एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. या सर्व प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मानवी हस्तक्षेप कमी असणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन पारदर्शकताही येणार आहे.
नेमका काय बदल होणार?
बँकिंग सिस्टमची सुविधा: बँकेत ज्या पद्धतीने व्यवहार करणे सोपे असतात, त्याच पद्धतीने पीएफ काढणेही सोपे करण्यात येणार आहे. मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे. त्यामुळे फसवणूक आणि गैरव्यवहार टळणार आहे.
पीएफची प्रकरणे वेगाने काढणार: सध्याच्या काळात पीएफची प्रकरणे निकाली काढण्यास मोठा कालावधी लागतो. परंतु नवीन प्रणाली ऑटोमेटेड असणार आहे. यामुळे पीएफची प्रकरणे वेगाने निकाली काढली जातील.
ईपीएफओचे व्हिजन: भविष्यात ईपीएफओ आयटी प्रणालीने अत्याधुनिक बनवला जाणार आहे. त्यामुळे पीएफ खातेदारांना प्रत्येक सुविधा मोबाईलवर किंवा जवळच्या एटीएम केंद्रावर मिळणार आहे.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव सुमित्रा डावरा यांनी सांगितले की, देशात बेरोजगारीच्या दरात घट झाली असून २०१७ मध्ये बेरोजगारीचा दर सहा टक्के होता. तो आता ३.२ टक्क्यावर आला आहे. तसेच कामगार भागिदारीची टक्केवारी वाढत आहे. आता ती ५८ टक्क्यांपर्यंत गेली आहे.