नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने बँकेतर वित्तीय कंपन्यांसाठी (NBFC) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरबीआयने सोने तारण कर्ज घेणाऱ्यांना जास्तीत जास्त 20 हजार रुपये रोख स्वरूपात वितरित करावेत, असे निर्देश दिले आहेत. 20 हजारांपेक्षा अधिक रुपये रोख स्वरूपात देऊ नयेत, असेही सांगितले.
प्राप्तिकर कायद्यानुसार दिलेल्या या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासही फर्मावले आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोने तारण कर्ज क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि बचतगट संस्थांना जारी केलेल्या सल्ला निर्देशांमध्ये, रिझर्व्ह बँकेने प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम 269 एसएस’चे कसोशीने पालन करण्यास सुचविले आहे.
तसेच आरबीआयने नुकतेच आयआयएफएल फायनान्सला अनेक गैरकारभार अनुसरल्याबद्दल सोने तारण कर्ज मंजूर करण्यास किंवा वितरित करण्यास मनाई केली आहे. आता त्याचेच पुढचे पाऊल म्हणून हे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, आता सोने तारण कर्ज घेणाऱ्यांना जास्तीत जास्त 20 हजार रुपये रोख स्वरूपात मिळणार आहेत.