नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँकेला मोठा धक्का दिला आहे.आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर तात्काळ प्रभावाने नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. आरबीआयने 31 जानेवारी 2024 रोजी हा आदेश जारी केला आहे. याशिवाय कंपनीला 29 फेब्रुवारीनंतर विद्यमान ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, सिस्टिम ऑडिट रिपोर्ट आणि त्यानंतरच्या संकलन प्रमाणीकरण रिपोर्टमध्ये कंपनीने सातत्याने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याची बाब समोर आली आहे. त्याशिवाय, पेटीएम बँकेशी संबंधित अनेक त्रुटी समोर आल्या असून भविष्यात आणखी आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाचही आरबीआयकडून करण्यात आले आहे.
तथापि, आरबीआयने असेही म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेचे विद्यमान ग्राहक त्यांच्या विद्यमान रकमेचा पूर्णपणे वापर करू शकतात. बचत खाते, चालू खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, फास्टॅग, नॅशनल किंवा कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये असले तरीही ते वापरले जाऊ शकतात. यावर तारखेचे बंधन नाही. सध्या तुमच्या खात्यात असलेले पैसे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही तारखेपर्यंत वापरू शकता.
सध्याच्या पेटीएम बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?
29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांमध्ये प्रीपेड सेवा, वॉलेट्स, FASTags, NCMC कार्ड्स इत्यादींमध्ये रक्कम जमा करणे, टॉप अप करणे, क्रेडिट व्यवहार करता येणार नाही. मात्र, व्याज जमा होणे, कॅशबॅक किंवा इतर बाबींवरील परतावा ग्राहकांच्या खात्यात जमा होईल, असेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.