नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा 15 वा हप्ता हस्तांतरित केला आहे. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान आज झारखंडमध्ये आहेत, तेथून त्यांनी शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता पाठविला गेला आहे. यावेळी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता पाठवला जाईल.
पीएम किसानचा 14 वा हप्ता 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. या अंतर्गत 17000 कोटी रुपये जारी करण्यात आले. त्याआधी 13 व्या हप्त्यासाठी 16800 कोटी रुपये जारी करण्यात आले होते. यावेळी सुमारे 18000 कोटी रुपये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना २.६२ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
केवायसी करणे आवश्यक:
पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळवणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनाही ई-केवायसी करणे सरकारने बंधनकारक केले आहे. 15 वा हप्ता देखील फक्त ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी हे काम केले नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत.
11व्या हप्त्यानंतर लाभार्थी घटले:
पीएम किसानच्या 11व्या हप्त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली. सरकारने वाढवलेल्या कठोर नियमांमुळे हा प्रकार घडला. त्याआधी लोक फसव्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत होते. 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 11 वा हप्ता मिळाला आहे. यानंतर 12 व्या हप्त्याचे लाभार्थी सुमारे 2 कोटींनी कमी होऊन 8 कोटी झाले. यानंतर, 13व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या 8.2 कोटी झाली, तर 8.5 कोटी शेतकऱ्यांना 14वा हप्ता मिळाला.