नवी दिल्ली : सध्या इंधनाच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यामुळे हे दर कमी व्हावेत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. जर हे जीएसटीच्या कक्षेत आल्यास देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सुमारे 20 रुपयांनी कमी होऊ शकतात.
जीएसटी कौन्सिलची नुकतीच बैठक झाली. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, ‘पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा नेहमीचा प्रयत्न आहे. आता राज्यांनी एकत्र येऊन त्याचे दर ठरवायचे आहेत’. दरम्यान, केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर व्हॅट राज्य सरकार गोळा करते.
याशिवाय, वाहतूक खर्च आणि डिलर कमिशन यांचा समावेश केल्यानंतर अंतिम किंमत येते. ही किंमत सध्या 100 रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
पेट्रोल 19.7 रुपयांनी होऊ शकते स्वस्त
पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले तर मोठा फायदा होणार आहे. जीएसटीचा कमाल दर 28 टक्के आहे. दिल्लीत पेट्रोलची मूळ किंमत 55.46 रुपये आहे. यावर 28 टक्के जीएसटी लावल्यास हा कर 15.58 रुपये होईल. वाहतूक खर्च आणि डिलर कमिशन अनुक्रमे 20 पैसे आणि 3.77 रुपये एकत्रित केल्यास अंतिम किंमत 75.01 रुपये होईल. अशा परिस्थितीत पेट्रोल 19.7 रुपयांनी स्वस्त होऊ शकते.