PM Kisan Samman नवी दिल्ली: 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील छोट्या शेतकऱ्यांना एक मोठी भेट देणार आहेत. खुंटी, झारखंड येथे सकाळी 11.30 वाजता पंतप्रधान मोदी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील. केंद्र सरकारने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 14 हप्ते जारी केले आहेत.
यावेळी पंतप्रधान किसान योजनेचा निधी हस्तांतरित करण्यासाठी झारखंडची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी 27 जुलै 2023 रोजी पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर 17,000 कोटी रुपये 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.
जगातील सर्वात मोठी योजना
पीएम किसान योजना ही जगातील सर्वात मोठी डायरेक्ट ट्रान्स्फर योजनांपैकी एक आहे. जी मोदी सरकारने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू केली होती. या योजनेत शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत मोदी सरकारने 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 14 हप्त्यांमध्ये 2.59 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.
हप्ता कधी निघतो
पीएम किसान योजनेचे हप्ते वर्षातून तीन वेळा जारी केले जातात. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो. लाभार्थ्यांची ओळख पटवणे आणि त्यांची योग्य माहिती पीएम किसान योजनेत अपलोड करणे ही राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी आहे. त्यानंतर हा डेटा आधार, पीएफएमएस आणि आयकर डेटाशी जुळवाला जातो. इतकी पडताळणी केल्यानंतरच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो. (PM Kisan Samman)