नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात ITR दाखल केलेल्या करदात्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, आता 26 ते 31 जुलैदरम्यान दाखल झालेल्या आयटीआरच्या पडताळणीची तारीख 26 ते 30 ऑगस्टदरम्यान असणार आहे. त्यामुळे या कालावधीत आयटीआर भरलेल्यांना आयटीआर पडताळणीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अन्यथा तुम्हाला आयकर परतावा मिळणार नाही.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्टपर्यंत एकूण 7,41,37,596 आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 7,09,89,014 आयटीआरची पडताळणी करण्यात आली आहे. अर्थात आतापर्यंत सुमारे 32 लाख करदात्यांची आयटीआर पडताळणी झालेली नाही. याशिवाय 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल केलेल्या सुमारे 19 लाख करदात्यांनी अद्याप त्यांची आयटीआर पडताळणी केलेली नाही.
आयटीआर दाखल करणाऱ्यांची आकडेवारी आता समोर आली आहे. यात प्रामुख्याने 26 जुलैपर्यंत सुमारे 5 कोटी आयटीआर दाखल झाले होते. तर उर्वरित अंदाजे 2.28 कोटी आयटीआर 27 ते 31 जुलै या कालावधीत दाखल करण्यात आले आहेत. आयकर विभागाकडून आयटीआर दाखल करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.