नवी दिल्ली : सेवानिवृत्तीनंतर अनेकांचे निवृत्तीवेतन हे बँकेत जमा होते. अशा सर्व पेन्शनधारकांसाठी सरकारने भारतीय स्टेट बँकेच्या सहकार्याने ‘इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल’ नावाचे नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. याचा फायदा असंख्य पेन्शनधारकांना होणार आहे.
एसबीआयच्या सहकार्याने बनवण्यात आलेल्या या ‘इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल’च्या माध्यमातून सेवांचा लाभ घेता येणार आहे. हे पोर्टल एकूण पाच बँकांच्या पेमेंट सेवा आणि पेन्शन प्रक्रिया एकाच ठिकाणी आणणार आहे. पेन्शन सेवा डिजिटल करण्यासाठी आणि पेन्शनधारकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून, पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट पूर्णपणे डिजिटल करणे हा त्याचा उद्देश असल्याचे पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हटले आहे.
‘इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल’मध्ये सेवानिवृत्त व्यक्तीला त्यांची कागदपत्रे ऑनलाईन जमा करण्याची, डिजीलॉकरवर पाठवण्याची आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पीपीओ जारी करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. पेन्शनशी संबंधित सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. याचा लाभ असंख्य पेन्शनधारकांना होणार आहे.