पुणे प्राईम न्यूज: आयएमपीएस हे पैसे हस्तांतरणाचे एक माध्यम आहे, जे खूप वेगाने पसरत आहे. इमीडिएट पेमेंट सर्विसेज (IMPS) साठी, सध्या तुम्हाला बेनेफिशयरी ॲड करावे लागते किंवा बँक खात्याचे इतर तपशील जसे की, अकाउंट नंबर आणि आयएफसी कोड देखील टाकावा लागतो. परंतु, आता असा नियम येत आहे, ज्याद्वारे तुम्ही जास्त तपशील न टाकता 5 लाख रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकता.
‘आयएमपीएस’शी संबंधित काय आहे नवीन नियम?
बँक ग्राहक लवकरच रिसीव्हरच्या बँकेचे नाव आणि मोबाईल नंबर टाकून आयएमपीएसद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे ट्रान्सफर करू शकतील. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आयएमपीएसद्वारे पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुलभ आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. एनपीसीआयनुसार, बेनेफिशयरी किंवा रिसीव्हरच्या बँकेचे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकूनच पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात.
एनपीसीआयने कोणत्या सुविधा पुरवल्या आहेत?
वापरकर्ते इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग ॲप्स, बँक शाखा, एटीएम, एसएमएस आणि इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) द्वारे आयएमपीएस करण्यासाठी अनेक चॅनेल वापरू शकतात. एनपीसीआयने अलीकडेच जाहीर केले आहे की, आयएमपीएसद्वारे पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुलभ केली जात आहे. मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगद्वारे यूजर्स बेनेफिशयरीजच्या मोबाइल नंबर आणि बँकेच्या नावावरूनच पैसे हस्तांतरित करू शकतील. हे पेमेंट रिअल-टाइम बेनेफिशयरीज नेम व्हॅलिडेशनद्वारे केले जाईल.
आता आयएमपीएसद्वारे पैसे कसे हस्तांतरित केले जातात?
आयएमपीएसद्वारे पैसे दोन प्रकारे हस्तांतरित केले जाऊ शकतात. पहिले पर्सन-टू अकाउंट पेमेंट आहे, ज्यामध्ये बेनेफिशयरीचा बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखा आणि आयएफसी कोड आवश्यक आहे. दुसऱ्यामध्ये, पर्सन टू पर्सन पेमेंट केले जाते. यामध्ये मोबाइल नंबर आणि मोबाइल मनी आयडेंटिफायर (MMID) वापरला जातो, ज्याद्वारे पैसे बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. परंतु, ही पद्धत फारशी लोकप्रिय नाही. कारण बहुतेक वापरकर्त्यांना त्यांचा मोबाइल मनी आयडेंटिफायर माहित नसतो.
नवीन आयएमपीएसनियम कसे काम करेल?
एनपीसीआयने म्हटले आहे की, नवीन आयएमपीएससह पर्सन-टू पर्सन मनी ट्रान्सफरसाठी एमएमआईडीच्या ऐवजी नवीन पद्धतीचा वापर वाढण्याची अपेक्षा आहे, कारण ते अधिक सोयीस्कर आहे. याच्या मदतीने तुम्ही आयएमपीएसद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत पैसे सहज ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुम्ही फक्त बेनेफिशयरीच्या बँकेचे नाव आणि त्याचा मोबाईल नंबर टाकून पेमेंट करू शकता. एनपीसीआयने असेही म्हटले आहे की, ही नवीन पद्धत किरकोळ ग्राहक तसेच कॉर्पोरेट वापरकर्ते मोठ्या व्यवहारांसाठी स्वीकारू शकतात. कारण ते खूप सोपे आहे.