मुंबई : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या 16 हजारांहून अधिक वाहने परत मागवली आहेत. इंधन पंप मोटरच्या एका भागामध्ये संभाव्य दोष दूर करण्यासाठी बलेनो आणि वॅगन-आर मॉडेल्सच्या 16 हजारांहून अधिक युनिट्स परत मागवल्या आहेत.
याबाबत मारुती सुझुकी इंडियाने सांगितले की, कंपनी 30 जुलै 2019 ते 1 नोव्हेंबर 2019 दरम्यान निर्मित 11,851 बलेनो वाहने आणि 4,190 वॅगन-आर वाहने परत मागवत आहे. या वाहनांच्या इंधन पंप मोटरच्या एका भागामध्ये संभाव्य दोष असल्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला. यामुळे काहीवेळेस इंजिन थांबू शकते किंवा इंजिन सुरू करण्यात समस्या निर्माण होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेता कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
ज्या वाहनांमध्ये दोष आहे अशा वाहनमालकांना मारुती सुझुकीच्या अधिकृत डीलर वर्कशॉपद्वारे योग्य वेळेत भाग मोफत बदलण्यासाठी संपर्क साधला जाणार आहे. हा दोष निघाल्याने मारुतीचे सर्वात मोठे रिकॉल असणार आहे.