मुंबई : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहेत. त्यात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स चांगले घसरले आहेत. तर लार्ज कॅपमधील काही समभाग वगळता इतर समभागांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी निफ्टी 222 अंकांनी घसरून 24,750 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 494 अंकांनी घसरून 81,0006 वर बंद झाला.
गेल्या 3 दिवसांत दोन्ही निर्देशांकात सुमारे 1.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक आज अनुक्रमे 1.53 टक्के आणि 1.23 टक्क्यांनी घसरले आहेत. आयटी वगळता बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांकही लाल रंगात व्यवहार करत होते. पण, सुधारणा केवळ आयटी क्षेत्रातच दिसून आली आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे बीएसई सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 21 समभाग घसरले, तर 9 समभागांमध्ये वाढ झाली.
आज शेअर बाजारातील घसरणीमुळे बीएसई मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांनी 4,63,29,045.07 वरून 4,57,27,893 रुपयांवर घसरले. आज गेल्या तीन दिवसांतील सर्वात मोठी घसरण झाली आहे. यामागील कारण म्हणजे काही हेवीवेट शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.