पुणे : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना महागाईचा झटका बसणार आहे. एलपीजी सिलिंडरचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एलपीजी गॅस सिलिंडर महाग झाला आहे. मात्र, ही दरवाढ 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झाली आहे.
IOCL च्या संकेतस्थळानुसार, दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या भावात बदल झाला. 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजता ही दरवाढ लागू करण्यात आली. आज जाहीर केलेल्या ताज्या दरानुसार, राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी गॅस सिलिंडर1652.50 रुपयांहून 1691.50 रुपये झाला आहे. दिल्लीत 39 रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली. कोलकत्ता शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या भावात 38 रुपयांची वाढ झाली. 1764.50 रुपयांहून किंमत 1802.50 रुपयांवर पोहचले. तर मुंबईत 1644 रुपयांहून भाव 1605 रुपये म्हणजे 7 रुपयांनी किंमत वाढली. चेन्नईमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये 38 रुपयांची दरवाढ झाली. 1817 रुपयांहून दर 1855 रुपयांवर पोहचला.
ऐन सणासुदीच्या तोंडावर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस महागल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. तर 14 किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जशीच्या तशी आहे. त्यात बदल झाला नाही.