नवी दिल्ली: आयुर्विमा कंपन्यांनी नवीन पॉलिसींच्या विक्रीतून मिळवलेले प्रीमियम उत्पन्न ऑगस्टमध्ये २२ टक्क्यांनी वाढून ३२,६४४ कोटी रुपये झाले आहे. लाइफ इन्शुरन्स कौन्सिल या उद्योग संस्थेने जारी केलेल्या मासिक आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत विमा कंपन्यांचे नवीन व्यवसाय प्रीमियम संकलन २१ टक्क्यांनी वाढून १,५४,१९४ कोटी रुपये झाले आहे. त्यापूर्वी ते १,२७,६६१ कोटी रुपये होते. हे डेटा दर्शविते की, नवीन पॉलिसींमधून कमावलेले प्रीमियम उत्पन्न ऑगस्ट २०२३ मध्ये २६,७८८. ५५ कोटी रुपयांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वाढून ३२,६४४ कोटी रुपये झाले.
मागील वर्षीच्या १,२७,६६१ कोटींवरून या वर्षी आतापर्यंतचे प्रीमियम कलेक्शन वाढून १,५४,१९४ कोटी रुपये झाले आहे. वैयक्तिक ग्राहक आणि कॉर्पोरेट ग्राहकांकडून विमा संरक्षणाची सतत मागणी असूनही, नवीन पॉलिसी जारी करणाऱ्यांची संख्या ऑगस्ट २०२४ मध्ये १.४४ टक्क्यांनी घसरून २३,९४,००७ वर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत विमा कंपन्यांनी २४,२८,८९५ पॉलिसी विकल्या होत्या. जीवन विमा कंपन्यांनी गेल्या महिन्यात १,०८,१४७ वैयक्तिक जीवन विमा एजंट जोडले. यासह, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला उपस्थित असलेल्या एकूण एजंटच्या संख्येत ३.७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.