नवी दिल्ली : आपल्या मिळकतीपेक्षा जास्त पैशांची जेव्हा गरज भासते तेव्हा व्यक्ती बँकेकडे जातो. तेव्हापासून कर्जाची खटपट सुरु होते. संबंधित व्यक्तीकडून काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर बँकेकडूनदेखील कर्जाची प्रक्रिया केली जाते. पण, हेच कर्ज घेताना काही काळजी घेतल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो.
जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर ते विविध कारणांसाठी आणि गरजेसाठी घेता येऊ शकते. पण तुम्ही अशाच खर्चांसाठी कर्ज घ्या जे तुम्हाला टाळता येणे शक्य नसते. तसेच जर शक्य असेल तर वैयक्तिक कर्ज घेणे टाळण्याचा सल्लादेखील अर्थतज्ज्ञांकडून दिला जातो. तुमचं ज्या बँकेत खाते आहे तिथूनच तुम्हाला कर्ज मिळते, असे नाही. तुम्हाला हव्या त्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. तुम्ही जर वैयक्तिक कर्ज घेणार असाल, तर ते तुम्ही कोणत्या बँकेतून घेणार आहात हे निश्चित करा. यानंतर कर्ज घेताना तुम्हाला नेमका किती खर्च येतो, याची माहिती असणे गरजेचे आहे.
आता कर्ज हे फक्त बँकेतूनच नाहीतर डिजिटल स्वरूपात ‘एनबीएफसी’द्वारेही घेता येते. पण हे कर्ज घेताना तुमचा चांगला क्रेडिट स्कोअर असणं गरजेचे आहे. वैयक्तिक कर्ज घेताना केवळ व्याजदरच नव्हे तर आगाऊ भरलेली रक्कम शुल्क आणि मुदतपूर्व बंद शुल्काची देखील माहिती असणे गरजेचे आहे.