नवी दिल्ली : सोन्याकडे एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. त्यानुसार, अनेकांचा याकडे कल असतो. पण, सध्या सोन्याच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सोने गेल्याचे पाहिला मिळत आहे. मात्र, काही परिस्थितीत जर पैशांची गरज असते तेव्हा कर्जाचा विचार केला जातो. त्यावेळी सोन्यावर कर्ज अर्थात गोल्ड लोन घेण्याचा प्रयत्नही असतो.
आरबीआयने फिनटेक किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे वितरित केल्या जाणाऱ्या सोन्याच्या कर्जाबद्दल महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. फिनटेक स्टार्टअप्स किंवा ऑनलाईन कंपन्या ज्या पद्धतीने गोल्ड लोनचे वितरण करत आहेत, त्यात सोन्याचे मूल्यांकन योग्य पद्धतीने होत नसल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. यामध्येही फिल्ड एजंटांकडून घरोघरी जाऊन गोळा केलेले सोन्याचे मूल्यांकन योग्य पद्धतीने केले जात नाही.
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सध्या ग्राहकांना त्यांच्या सोन्याच्या एकूण मूल्याच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते. पण जर सोन्याचे चुकीचे मूल्यांकन केले गेले तर सोन्याच्या तुलनेत कमी रकमेचे कर्ज मिळते. अशा परिस्थितीत, हे कर्ज इतर कर्जापेक्षा महाग पडते. कारण प्रत्यक्षात मूल्याच्या बरोबरीने पैसे मिळत नाहीत. ज्यामुळे भांडवलाचे नुकसान होते. पण व्याज तर भरावेच लागते, असेही यामध्ये सांगण्यात आले.