मुंबई : सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. त्यानुसार, कंपन्यांकडूनही चांगला परतावा दिला जात आहे. त्यात केईसी इंटरनॅशनल ही कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे. ही एक जागतिक पायाभूत सुविधा ईपीसी कंपनी असून, या कंपनीला सौदी अरेबियाकडून 1423 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये उच्चांक गाठल्याचेही पाहिला मिळाले.
याबाबत कंपनीकडून सांगण्यात आले की, ‘सौदी अरेबियाकडून 380 केव्ही ट्रान्समिशन लाईनसाठी 1423 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन व्हर्टिकलमध्ये चांगले ट्रॅक्शन दिसत आहे. यावर्षी आतापर्यंत कंपनीला 11300 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 75 टक्के अधिक आहे. याआधी कंपनीला यूएई आणि ओमानमधूनही ऑर्डर मिळाल्या होत्या. सौदी अरेबियाच्या नवीन ऑर्डरमध्ये कंपनीचे मध्य पूर्वेतील मजबूत अस्तित्व दिसून येते’.
केईसी इंटरनॅशनल ही जागतिक अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) कंपनी आहे. ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन, सिव्हिल, रेल्वे, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्युएबल, ऑईल आणि गॅस आणि केबल सेगमेंटमध्ये काम करते. 110 हून अधिक देशांमध्ये कंपनीचा विस्तार वाढला आहे. त्यामुळेच आता या कंपनीला कोट्यवधींच्या ऑर्डर्स मिळाल्याचे दिसून येत आहे.