नवी दिल्ली : ‘सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस’ने (सीबीडीटी) प्रत्यक्ष कर संकलनाचे आकडे जारी केले आहेत. या आकडेवारीनुसार सरकारने चालू आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये 10 फेब्रुवारीपर्यंत 18.38 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर वसूल केला आहे. 10 फेब्रुवारी 2024 पर्यंतचे हे संकलन मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 2.71 लाख कोटी रुपयांनी अधिक आहे.
केंद्र सरकारकडे 15.67 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर 10 फेब्रुवारीपर्यंत प्राप्त केला होता. चालू आर्थिक वर्षातील करसंकलनाच्या सुधारित लक्ष्याच्या तुलनेत 80.23 टक्के प्रत्यक्ष कर वसूल झाला आहे. परताव्यानंतर निव्वळ कॉर्पोरेट प्राप्तिकर संकलनात वार्षिक आधारावर 13.57 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर निव्वळ वैयक्तिक प्राप्तिकर संकलनात मागील वर्षाच्या तुलनेत 26.91 टक्क्यांची वाढ झाली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य 18.23 लाख कोटी रुपयांवरून वाढवत 19.45 लाख कोटी रुपये केले होते. त्यात परतावा सोडून निव्वळ कर संकलन मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 20.25 टक्क्यांनी वाढून 15.60 लाख कोटी रुपये राहिले आहे. सरकारने 1 एप्रिल ते 10 एप्रिलदरम्यान 2.77 लाख कोटी रुपयांचा कर परतावा देखील जारी केला आहे.