नवी दिल्ली : भारताचा विकासदर अर्थात जीडीपी चालू वर्षात 6.8 टक्के त्यानंतर 2025 मध्ये 6.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज ‘मूडीज रेटिंग’ने वर्तवला आहे. हे रेटिंग निवडणुकीनंतरच्या धोरणातील सातत्यांसह मजबूत, आर्थिक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताचा जीडीपी 2023 मध्ये 7.7 टक्क्यांनी वाढला. 2022 मध्ये हा जीडीपी 6.5 वर होता. मात्र, 2023 मध्ये यात वाढ झाली आहे. या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात भांडवली खर्चाच्या वाटपाचे लक्ष्य 11.1 लाख कोटी रुपये किंवा 2024-25 मध्ये जीडीपीच्या 3.4 टक्के इतके आहे. 2023-24 च्या अंदाजापेक्षा 16.9 टक्के जास्त असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर धोरणात सातत्य राहण्याची आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सतत लक्ष केंद्रित करण्याची आम्हाला अपेक्षा असल्याचेही म्हटले आहे.
तसेच भारतीय अर्थव्यवस्था सहा-सात टक्क्यांनी वाढली पाहिजे, असा विश्वास असल्याचेही मूडीजने ‘ग्लोबल मॅक्रो-इकॉनॉमिक आउटलुक 2024-25 मध्ये म्हटले आहे. यावर्षी सुमारे 6.8 टक्के वाढीचा अंदाज लावल्याचेही सांगण्यात आले.
मूळ चलनवाढ कमी
चलनवाढीच्या दृष्टीकोनात तुरळक खाद्यपदार्थांच्या किमतीचा दबाव अस्थिर राहतो. मात्र, एप्रिलमध्ये एकूण आणि मूळ चलनवाढ अनुक्रमे 4.8 टक्के आणि 3.2 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचीही माहिती दिली जात आहे.