नवी दिल्ली : देशात आजपासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. यापैकी एक नियम जीवन विमा पॉलिसीशी संबंधित आहे. या अंतर्गत, पॉलिसी सरेंडरचे नियम बदलण्यात आले आहेत. त्यानुसार, जर तुम्ही पॉलिसी सरेंडर केली तर तुम्हाला अधिकचा परतावा मिळणार आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2024 अर्थात आजपासून लागू झाले आहेत. जर तुम्ही तुमची पॉलिसी पहिल्या वर्षी सरेंडर केली, तर तुम्हाला तुमच्याद्वारे जमा केलेला संपूर्ण जीवन विमा प्रीमियम गमावावा लागणार नाही. त्याऐवजी, नवीन नियमानुसार पॉलिसीधारकांनी फक्त एक वार्षिक प्रीमियम भरला असला तरीही, पॉलिसीधारकांना पहिल्या वर्षापासूनच गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू मिळणार आहे.
विमा नियामक मंडळाने केलेला नवीन बदल दिलासा देणारा आहे, कारण यापूर्वी ही सुविधा पॉलिसीधारकाला दुसऱ्या वर्षापासून उपलब्ध होती. याचा अर्थ असा की विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर, त्याला त्याची पॉलिसी (इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर नियम) कमीत कमी दोन पूर्ण वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतरच सरेंडर करण्याची सुविधा मिळत असे. जुन्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पहिल्या वर्षी कोणतेही सरेंडर मूल्य नव्हते. पण आता यात बदल झाला आहे.