नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील IDFC लिमिटेड आणि IDFC First बँक यांचे विलीनीकरण होणार आहे. या विलीनीकरणाला IDFC फर्स्ट बँकेच्या बहुतांश शेअरहोल्डर्संनी मान्यता दिली आहे. त्यामुळेच आता या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. IDFC फायनान्शियल होल्डिंग कंपनी लिमिटेड, IDFC लिमिटेड आणि IDFC फर्स्ट बँकेच्या कार्यकारी मंडळाने जुलै 2023 मध्ये या विलीनीकरणाला मान्यता दिली होती. त्यानुसार, आता IDFC Limited आणि IDFC First बँकेचे विलीनीकरण होणार आहे.
IDFC First बँकेने शेअरहोल्डर्सच्या या निर्णयाची माहिती स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. विलीनीकरणाच्या प्रस्तावाला 99.95 टक्के इक्विटी शेअरहोल्डर्संनी मान्यता दिली आहे. एनसीएलटीने आयोजित केलेल्या बैठकीत ई-व्होटिंग आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे हा निर्णय घेण्यात आला. लवकरच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडूनही हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने डिसेंबर 2023 मध्ये IDFC लिमिटेड आणि तिची बँकिंग उपकंपनी IDFC फर्स्ट बँक यांच्या विलीनीकरणास परवानगी दिली होती.
IDFC Limited ची स्थापना 1997 मध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी करण्यात आली. त्यात 2014 मध्ये, कंपनीला RBI ने बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्यास मान्यता दिली होती. यानंतर आयडीएफसी फर्स्ट बँकेने ऑक्टोबर 2015 पासून कामकाज सुरू केले आहे.