नवी दिल्ली : सध्या गुंतवणूकदारांचा बहुतांश कल हा शेअर मार्केटमध्ये लागलेला आहे. त्यानुसार, गुंतवणूक देखील केली जाते. त्यातच आता दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाई 25 हजार कोटींचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, सेबीकडे प्राथमिक कागदपत्रेही दाखल केली आहेत.
आयपीओ हा ह्युंदाई मोटर कंपनीद्वारे संपूर्णपणे 14,21,94,700 इक्विटी समभागांच्या विक्रीसाठी ऑफर आहे. यामध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. मूळ कंपनी ह्युंदाई कंपनी आयपीओद्वारे सुमारे तीन अब्ज डॉलर्स (सुमारे 25,000 कोटी रुपये) उभारू इच्छित आहे. जर कंपनीच्या आयपीओला सेबीची मान्यता मिळाली तर ती भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक ऑफर असेल.
मारुती सुझुकी इंडियानंतर ह्युंदाई ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. ह्युंदाईचा आयपीओ भारतीय उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. प्रस्तावित निधी उभारण्यासाठी ते एचएमआयएलमधील 15-20 टक्के हिस्सेदारी विकू शकते, असेही म्हटले जाते.