नवी दिल्ली : ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्हे सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यांच्यावर आता सरकारकडून मोठी कारवाई केली जाणार आहे. ऑनलाईन फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने एक नवीन योजना तयार केली आहे, ज्याअंतर्गत सरकार येत्या 15 दिवसांत सुमारे 18 लाख सिम आणि मोबाईल कनेक्शन बंद करणार आहे.
दूरसंचार विभागाने Jio, Airtel आणि Vi सारख्या दूरसंचार कंपन्यांना 28,220 मोबाईल बँड बंद करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय सुमारे 20 लाख मोबाईल कनेक्शनची फेरतपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मोबाईल हँडसेटच्या माध्यमातून होणारी ऑनलाईन फसवणूक हे त्यामागचे कारण आहे. एका अहवालानुसार, देशात मोबाईल फोनद्वारे होणारे सायबर गुन्हे वेगाने वाढत आहेत. 2023 मध्ये डिजिटल आर्थिक फसवणुकीमुळे सुमारे 10,319 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी 6,94,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
एका अहवालानुसार, वेगवेगळ्या प्रदेशातील सिम वेगवेगळ्या प्रदेशात फसवणुकीसाठी वापरले जातात. गेल्या वर्षी सायबर फसवणुकीत गुंतलेली 37 हजार सिमकार्ड बंद करण्यात आली आहेत. या कालावधीत सुमारे 17 दशलक्ष मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. याशिवाय 1,86,000 हँडसेट ब्लॉक करण्यात आले आहेत.