नवी दिल्ली: भारतातील Google Pay वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गुगल पे मोबाईल रिचार्जसाठी वेगळे पैसेही आकारणार असल्याची बातमी आहे. अनेक वापरकर्त्यांनी दावा केला आहे की, Google Pay वर कन्वीनियंस शुल्काच्या नावाखाली पैसे घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत गुगल पेद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नव्हते, परंतु आता तुम्हाला ते भरावे लागणार आहेत.
गुगलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, अनेक सोशल मीडिया यूजर्सने हा दावा केला आहे. फोन पे आणि पेटीएम आधीच मोबाइल रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारत आहेत. जेव्हा या कंपन्यांनी रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली तेव्हा गुगलने सांगितले होते की, त्यांच्या गुगल पेवर मोबाइल रिचार्ज नेहमीच विनामूल्य असेल. यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.
सुप्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मा यांनी ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये हे पाहिले जाऊ शकते की Jio च्या 749 रुपयांच्या रिचार्जसाठी गुगल पे 752 रुपये आकारत आहे. ज्यामध्ये सुविधा शुल्क म्हणून 3 रुपये जोडले आहेत. हे सुविधा शुल्क अॅपद्वारे युपीआय आणि कार्ड पेमेंट मोडमध्ये भरावे लागेल. रिपोर्टनुसार, 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रिचार्जसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. 200-300 रुपयांपर्यंतच्या रिचार्जसाठी 2 आणि 3 रुपये रिचार्जसाठी तुम्हाला सुविधा शुल्क म्हणून भरावे लागतील. पेटीएम आणि फोनपे देखील समान शुल्क आकारतात.