नवी दिल्ली : सध्या ‘गुगल पे’चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोणतेही डिजिटल व्यवहार करायचे असल्यास ‘गुगल पे’ला प्राधान्य दिले जाते. पण ही सेवा देशांतर्गतच उपलब्ध होती. म्हणजे देशभरात कोणालाही पैसे पाठवू शकत होतो. मात्र, आता सेवा देशाबाहेर मिळणार आहे. त्यासाठी ‘गुगल पे’ने ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (NPCI) सोबत करार केला आहे.
सामंजस्य करार (MoU) अंतर्गत, भारतीय प्रवासी आता Google Pay द्वारे इतर देशांमध्ये पेमेंट करू शकतील. या सुविधेमुळे रोख रक्कम घेऊन जाण्याची किंवा आंतरराष्ट्रीय पेमेंट गेटवेवर जाण्याची गरज नाहीशी होणार आहे. ‘गुगल पे’ने निवेदनात म्हटले आहे की, ‘एमओयूची तीन मुख्य उद्दिष्टे आहेत. प्रथम, भारताबाहेरील प्रवाशांसाठी UPI पेमेंटचा वापर वाढवायचा आहे, ज्यामुळे त्यांना परदेशात सहज व्यवहार करता येईल’.
दुसरे म्हणजे, या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट इतर देशांना UPI सारख्या डिजिटल पेमेंट सिस्टमच्या स्थापनेमध्ये मदत करणे हा आहे. जे अखंड आर्थिक व्यवहारांसाठी एक मॉडेल तयार करेल. शेवटी, ते UPI पायाभूत सुविधा वापरणाऱ्या देशांमधील पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ज्यामुळे देशाबाहेर आर्थिक व्यवहार सुलभ करता येणार आहेत.