नवी दिल्ली : तैवानची कंपनी होन हाय अर्थात फॉक्सकॉनने चीनला एक मोठा धक्का दिला आहे. फॉक्सकॉन भारतात सुमारे 13 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ही गुंतवणूक बांधकाम प्रकल्पांमध्ये असेल, असे सांगण्यात येत आहे. तैवानमधील एक्सचेंज फायलिंगमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे.
फॉक्सकॉनच्या कमाईपैकी अर्धा हिस्सा अॅपल इन्कसह व्यवसायातून येतो. तैवानची कंपनी भारतातील आपल्या व्यवसायाचा आकार दुप्पट करण्याचा विचार करत आहे. फॉक्सकॉन भारतात आधीपासून 9 प्रोडक्शन कॅम्पस आणि 30 पेक्षा जास्त कारखाने चालवते. देशात 13 हजार कोटींची गुंतवणूक ही केवळ ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्यासाठी केली जात असल्याचे सांगितले.
दरम्यान, कंपनीच्या प्रवक्त्याने नवीन सुविधा कुठे असतील आणि तिथे काय बांधले जाणार हे सांगण्यास नकार दिला. तैवानच्या कंपन्या अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे चीनबाहेर त्यांचा व्यवसाय वाढवण्याचे काम करत आहेत. फॉक्सकॉनच्या या निर्णयाने चीनला जरी धक्का बसला असला तरी भारताला यामुळे गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे.